शहादा: ग्रामविकास संस्था संचलित कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 31 ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न , लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा येथील डॉ. सतीश भांडे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक विद्यार्थी विकास विभाग प्रमुख डॉ. सी. एस. करंके यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून डॉ. वाय. सी. गावित यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला.
वल्लभाईंचे जीवन तसेच त्यांनी केलेली कामगिरी आजच्या काळात किती महत्त्वाची आहे हे त्यांनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एन.गिरासे यांनी भारतरत्न सरदार वल्लभाई पटेल यांच्या राजकीय विचारांवर प्रकाश टाकला आणि त्यांचे कणखर व्यक्तिमत्व कसे होते त्याविषयी अनेक पैलू उलगडून दाखविले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. एम. एस. निकुंभे यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ विद्यार्थ्यांना दिली आणि कार्यक्रमाचे आभार प्रकटन केले. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.