शहादा : बामखेडा येथील ग्राम विकास संस्थेच्या कला महाविद्यालयात महाविद्यालयाचे आयक्यूएसी व स्टाफ ॲकॅडेमीच्या वतीने आयकर संदर्भात उद्बोधन वर्ग संपन्न झाले. सदर उद्बोधन वर्गात आयकर संदर्भातील विशेष प्रकारचा अभ्यास असलेले व परिसरातील ख्यातनाम आयकर सल्लागार अल्ताफ हासमानी यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांचेसोबत त्यांच्या कार्यालयातील व जे 28 वर्ष सलगपणे अल्ताफ भाई यांचे सोबत सेवा करीत असलेले जावेदभाई सय्यद सुद्धा उपस्थित होते.
अल्ताफ भाई व जावेदभाई यांनी सर्व उपस्थितांना आयकराची नवी प्रणाली व जुनी प्रणाली यांचे उदाहरणासह सविस्तर विवेचन केले.सदर विवेचन करीत असताना चालू वर्षाचा बजेट व निरनिराळ्या तरतुदी यांचाही आढावा मांडला. आपल्या उदबोधनात श्रीमान अल्ताफ यांनी निरनिराळ्या गुंतवणुका व त्यांचा आयकरावर होणारा परिणाम, आरोग्य विमा, सीनियर सिटीजन यांचे रक्षणासाठी खर्च व त्यावरील आयकर. सुट, डिपेंडंट वरील आजार खर्च व आयकर सुट, करपात्र देणगी रक्कम व आयकर या संदर्भात सविस्तरपणे आयकर कायद्याच्या विविध कलमांचा आधारे विवेचन केले.त्यानंतर ग्राम विकास संस्थेच्या उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी विविध शंका उपस्थित करून शंकांचे समाधान करण्यात आले.
उद्बोधन वर्गामध्ये संस्थेच्या प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री उद्धव बाई चौधरी,पीएमसी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक आणि महाविद्यालयाच्या महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री निमजीभाई चौधरी, इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उद्बोधन वर्गाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी केले. तसेच उपस्थित दोन्ही तज्ञांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानही केला.शेवटी प्रा.डॉ. आर एस जगताप यांनी आभार प्रकटन करून कार्यक्रम संपन्न केला.