विद्यार्थी व परिसर विकास हेच आमचे ध्येय – प्राचार्य डॉ.एच.एम.पाटील
नंदूरबार: शुक्रवार 26 जुलै 2024 रोजी ग्राम विकास संस्था संचलित कला महाविद्यालय बामखेडे त.त. व ग्रामपंचायत जयनगर यांच्या संयुक्त विद्यमान पालक मेळावा अत्यंत उत्साहात संपन्न झाला.ग्रामपंचायत कार्यालय जयनगर येथे नवीन शैक्षणिक धोरण 20-20 व कौशल्य विकास या विषयावर पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच एम पाटील सर यांनी नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते बरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव देणारी शिक्षण पद्धती आहे. शिवाय आपल्या मातृभाषेत आपल्याला आपल्या आवडीनुसार विषय व शाखांची निवड करता येईल कला शाखेचा विद्यार्थी विज्ञान व वाणिज्य शाखांचाही अभ्यास करू शकतो व आपल्या कलागुणांना चालना देऊ शकतो अशा प्रकारचे ही शिक्षण पद्धती आहे या शिक्षण पद्धतीमुळे भविष्यात विद्यार्थ्यांना बेरोजगार राहण्याची वेळ नक्कीच येणार नाही तर विद्यार्थी स्वयंभू विकास साध्य करेल व स्वतःच्या विकासाबरोबरच राष्ट्र विकासात त्यांचा अनमोल सहभाग असेल. आमचे संस्थाचालक व आमचा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हा विद्यार्थी व परिसराच्या विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून कार्य करत असतो. आमच्या ग्रामविकास संस्थेला आता विज्ञान शाखेला शासन मान्यता मिळालेली आहे. म्हणून येत्या वर्षात प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही 100% रोजगार सेल मधुन नोकरी व व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे.
पी एम उषा या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत 5 कोटी रुपये निधी मंजुरी मिळणारे नंदुरबार जिल्ह्यातील आमच्या संस्थेचे कला महाविद्यालय एकमेव महाविद्यालय आहे. म्हणून येत्या काळात विद्यार्थ्यांना खूप मोठी संधी महाविद्यालय उपलब्ध करून देणार आहे. पालक मेळावा पुर्व गावातील नागरिकांशी प्राचार्यांनी हितगुज केले. त्याप्रसंगी माननीय प्राचार्य साहेबांनी शेतकरी पालकांना गावरान बियाण्याचे वाटप केले व गावरान बियाणे संवर्धन व विकासाची जबाबदारी आपण घ्यावी जेणेकरून आपल्याला सकस जैविक व भरपूर अन्नद्रव्य असणारे भाजीपाला फळ मिळतील त्यातून आपल्या आरोग्याबरोबरच निसर्गाच्या समतोल व संतुलन साधण्यास आपली भूमिका महत्त्वाची असणार आहे.पुढील काळात बियाणांचा प्रचार प्रसार आपल्या माध्यमातून झाला पाहिजे अशी अपेक्षा प्राचार्यांनी व्यक्त केली.
सदर पालक मेळाव्यात प्रास्ताविक करताना प्रा. अनिल गोसावी यांनी आमची ग्रामविकास संस्था ही ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहु नये या ध्येयाने व उद्देशाने स्थापना केली. संस्था विद्यार्थी व परिसर विकासासाठी नेहमीच तत्पर असते. संस्थेने 55 वर्षांपूर्वी स्थापन केलेली ग्राम विकास संस्था आज विविध शाखांनी भरभराटीला आलेली आहे. उच्च शिक्षणात कला शाखेबरोबरच विज्ञान शाखा ही आमच्याकडे सुरू झालेली आहे व येत्या काळात अनेक रोजगार व व्यवसाय भिमूख व्यवसाय अभ्यासक्रम सुरू होत आहेत या संधीचा फायदा पंचक्रोशीतील समाजाला होईल व परिसराचा विकास होईल यातून संस्थेचा उद्देश सफल होईल. विद्यार्थ्यांच्या यशाची परंपरा, शिस्त, गुणवत्तापूर्ण कर्मचारी वृंद, पालकांच्या विश्वासास पात्र, व समाज सेवेचा ध्यास असलेले संचालक मंडळ यामुळेच ग्रामविकास संस्थेने पंचक्रोशीत नावलौकिक प्राप्त केले आहे. म्हणूनच मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्या ग्रामविकास संस्थेत विद्यार्थ्यांना प्रवेशित करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी जयनगर गावचे उपसरपंच ईश्वर भाऊ माळी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की मी या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे या महाविद्यालयाकडून मला जे काही संस्कार व शिक्षण मिळाले त्याचाच परिपाक म्हणून मला महाराष्ट्र शासनाने माझ्या कार्याबद्दल वनश्री पुरस्कार व आदिवासी जनसेवक पुरस्काराने सन्मानित केले आहे यामागे माझ्या कार्याबरोबरच माझ्या गुरुंच्या मार्गदर्शनाचा व संस्काराचा सिंहाचा वाटा आहे ते मी कधीच विसरणार नाही. त्याबरोबरच परिसरातील मुलांनी बामखेडा येथील महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आव्हान केले.
याप्रसंगी पालकांचे प्रतिनिधी म्हणून निवृत्ती शिक्षक आत्माराम गुरुजी यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की विद्यार्थी घडवण्यामध्ये शिक्षकांबरोबरच पालकांचा व स्वतः विद्यार्थ्यांचा सहभाग हा अतिशय महत्त्वाचा असतो मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणून विद्यार्थ्याने शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार स्वतःला घडवावे व एक आदर्श नागरिक म्हणून समाजात वावरावे. विद्यार्थ्यांच्या यशामुळे त्याचा शिक्षकाला जो अभिमान व गर्व वाटतो त्याची किंमत पैशात होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांचे यश हाच शिक्षकांचा पुरस्कार असतो असे मत गुरुजींनी मांडले.
पालक मेळाव्याचे समन्वयक म्हणून डॉ. यशवंत गावित सर यांनी पालक व विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विद्यार्थी कल्यानाच्या विविध योजना बाबत माहिती दिली तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानलेत.
जयनगर येथील पालक मेळाव्याचे अध्यक्षस्थान गावाचे सरपंच माननीय मोगराज सोनवणे यांनी भूषविले याप्रसंगी गावाचे ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्य पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालक मेळावा यशस्वी करण्यासाठी आजी-माजी विद्यार्थी संघ, जयनगर ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक ज्येष्ठ नागरिक व श्री चक्रधर माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आणि महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच जयनगर या सर्वांचे सहकार्य लाभलं त्याबद्दल ग्रामविकास संस्था व कला महाविद्यालयाच्या वतीने डॉ . गावीत सर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
1 comment
उत्तम बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार