बँकेच्या शाखांची संख्या आता १५०० पेक्षा जास्त
२८ जून २०२३ – बंधन बँक या देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या बँकांपैकी एका बँकेने आज आपल्या कामकाजाच्या ८ वर्षांच्या काळात शाखांची संख्या तिपटीने वाढवण्याचा विक्रम केला आहे. बँकेच्या एकूण शाखांची संख्या आता १५०० आहे. बँकेच्या नेटवर्कमध्ये आधीपासूनच ४५०० बँकिंग युनिट्सचा समावेश असून आता देशभरातील बँकिंग आउटलेट्सची एकूण संख्या ६००० वर गेली आहे. बँकेने २३ ऑगस्ट २०१५ रोजी ५०१ शाखांपासून आपला प्रवास सुरू केला होता.
बँकेतर्फे ३४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या ६००० बँकिंग आउटलेट्सच्या मजबूत नेटवर्कच्या माध्यमातून ३ कोटीपेक्षा जास्त ग्राहकांना सेवा दिली जाते. ग्राहकांच्या ते कुठेही राहात असले तरी, त्यांना कोणत्याही प्रकारचे आर्थिक उत्पादन हवे असले तरी त्या गरजा त्यांच्या पसंतीच्या फिजिकल किंवा डिजिटल माध्यमातून पुरवण्यासाठी बँक प्रयत्नशील आहे.
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्र शेखर घोष म्हणाले, ‘आज गाठलेला टप्पा बंधन बँकेसाठी ऐतिहासिक आहे. गेल्या आठ वर्षांत बँकेने केलेला वेगवान विस्तार हे देशाच्या कानाकोपऱ्यातील ग्राहकांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. भारतामध्ये बँक सेवा आणखी खोलवर पोहोचणे आवश्यक आहे, ज्यामुळे सर्वांना या सेवांचा लाभ घेता येईल. वेगाने विस्तारत असलेले शाखांचे नेटवर्क आणि डिजिटल उत्पादनांच्या मदतीने बंधन बँक ग्राहकांना सोयीस्कर व सुरक्षित सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहे.’
बँकेने वैविध्यपूर्ण उत्पादने आणि भौगोलिक अस्तित्वाच्या बाबतीत लक्षणीय कामगिरी केली आहे. बँकेद्वारे पारंपरिक प्रदेशांपलीकडे जात पूर्व आणि ईशान्येमध्ये विस्तार केला जाईल तसेच शहरी व ग्रामीण भागात विस्तार करण्याचा समतोल साधला जाईल. बँक सुरक्षित कर्ज क्षेत्रातील हिस्साही हळूहळू वाढवत आहे. बँकेद्वारे गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज, दुचाकी कर्ज आकर्षक दरांत उपलब्ध करण्यात आली आहेत. बँकेने ग्राहकांच्या सोयीसाठी नुकतेच निओ प्लस डिजिटल सेव्हिंग्ज बँक खाते सुरू केले.